सावली



सावली 

थकलेले एक झाड एकदा बाप्पाकडे आले,
वठलो रे मी आता म्हणत दुःख करू लागले 
फळेही आता येत नाहीत, फांद्याही वाळू लागल्या
कर्मकहाणी आपली सांगता हमसून रडू लागले.

बाप्पाने हळूच वाऱ्याला इशारा केला
वारा हळूच झाडाला गुदगुल्या करु लागला
दुपार नुकती सरत होती, संध्या छाया येऊ घातल्या
तेव्हा बाप्पा स्वतः चित्र काढायला बसला

लाल सूर्य, हिरवी धरती आणि गर्द निळे आकाश
बोलावला ढगांचा कापूस थोडा, रंग भरू लागला
झाडाच्या आठवणी तेव्हा हळू जाग्या होऊ लागल्या
फांद्या पाने सरसावून झाडाने सावलीचा खेळ मांडला

खोडाच्या मुळाशी मातीला सावलीने मारली मिठी
वाऱ्याची साथ घेऊन झाडाने मारली सुंदर शिटी
दुपारच्या उन्हाच्या झळा सावलीने कमी होऊ लागल्या,
निसर्गाची छत्री होऊन झाडाने दिलासा मोठा दिला

थकलेला एक लाकूडतोड्या घाम टिपत आला
शांत सावली पाहताच मनात समाधानी तो झाला
मोडून भाकरतुकडा आपला घास त्याने खाल्ला
नंतर त्या झाडाच्या सावलीत तो विश्रांती घेऊ लागला

सर्वांगावर होती सावली पात्र एकच तिरीप डोळ्यावर आली
काल तर चटका नव्हता अस म्हणत त्याने मान वर केली
आजच त्याने त्याच झाडाची छाटली होती एक फांदी
तोडलेल्या फांदीने त्याची हिरावली होती सावली.

पोटाला सांभाळायचे त्याला लाकूड तोडणे भाग होते
पण त्या तिरीपीने त्याचा काळीजठोका चुकवला
क्षणभर विचार केला त्याने, बाजूला खड्डा थोडा खोदला
एका बीजाला पुरून त्याने झाडाला नवा जन्म दिला

घेतला वसा लाकूडतोड्याने, कर्म धर्म जरी पाळेन मी
एका तोडलेल्या फांदीसाठी चार झाडे लावीन मी
झाडाला होती सिद्धी माणसाच्या मनातले ते ओळखण्याची
प्रतिज्ञा त्याची ऐकून झाडाने समाधानाने श्वास घेतला

श्वासाबरोबर त्या एका, झाडाची पाने सळसळ हलली
सूर्याच्या किरणांची वाट त्यांनी वरच्यावर अडवली
तिरीप झाकली, नवी सावली डोळ्यावर त्याच्या आली
झाडाचा आशीर्वाद जणू, तो सावलीत शांत झोपला

बाकीचे मात्र झोपलेलेच होते, आपापल्या सिमेंटच्या घरात
त्यांची स्वप्ने होती मोठी, चंद्रावर वसाहत करण्यात
धरतीला ओरबाडून नष्ट केले, तेव्हा उपरती झाली
एका झाडाच्या सावलीसाठी त्याची पुढची पिढी आसुसली




Comments

  1. वाठलेले झाड अन् चार झाडे लावणे "संदेश". तृप्तते कडे नेणारा ~~~~~>

    ReplyDelete
  2. मन नितळ ! छान ✓

    ReplyDelete
  3. मन काच नितळ हवेहवेसे वाटणे.आरपार अन् स्पष्ट दिसणे. मन सांज वेळेचे,आठवणी !!

    ReplyDelete

Post a Comment