काव्यरूपी मराठी अथर्वशीर्ष

।। काव्यरूपी मराठी श्री गणपती अथर्वशीर्ष ।। 




।। श्री ।।

प्रारंभी वंदुनी गणेशा, कार्य हे आरंभितो । 
गणकऋषी तुम्हांही वंदन, अथर्वशीर्ष अनुवादितो ।। १।।

ब्रह्मतत्त्व साक्षात तू, सृष्टीचा निर्माता तू । 
पालनपोषण कर्ता तू , तसेच मोक्षदाता तू ।।२।।

चराचरी या वसशी तू, सर्वव्यापी परब्रह्म तू । 
यथार्थ सत्य स्मरणीय नित्य , अविनाशी परमात्मा तू ।।३।।

मम वाणी नित्य करूदे तुझेच रूपवर्णन रे । 
श्रवणी सदा नित्य पडूदे तुझ्या गुणांचेच भजन रे ।।४।।

करीन मी जे दान सदैव, ते तुझ्या भक्तीचे रे । 
साध्य होई जे जे मजला ते ते तुझ्या कृपेने रे ।।५।।

नित्यपठण कुणी या स्तोत्राचे पूर्ण भक्तीने करतील रे । 
 शिष्य मानुनी त्या सर्वांचे, सदैव करशी रक्षण रे ।।६।।

पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आसमंतातूनही रे । 
येता संकट कधीही अचानक करी निवारण त्यांचे रे ।।७।।

वाणी ज्ञान हर्षात तू सर्वव्यापीही असशी तू । 
सच्चिदानंदSस्वरूपी अद्वितीय परब्रम्ह तू ।।८।।

सृष्टी निर्मिली तुझ्यातूनी अन् तूच तिचा तारकही रे । 
अंत जरी करशील तिचा तरी तुझ्यातचि ती विरेल रे ।।९।।

पृथ्वी जलाग्नी आकाश वायू पंचतत्त्व प्रतिरूप तू । 
परापश्यन्ति मध्यमावैखरी वाणींची या स्फूर्ती तू ।।१०।।

तम रज सत्व त्रिगुण वा स्थूलसूक्ष्मानंदी देह रे । 
भविष्य भूत वर्तमान सर्वांच्या तू पार रे ।।११।।

जागृत स्वप्न असो वा निद्रा मूलाधारी वसशी तू । 
जारक तारक मारक तूचि ध्यानमूर्ती योग्यांची तू ।।१२।।

ब्रम्हा विष्णू रुद्र आणखी इंद्र अग्नी वायुहि तू । 
सूर्य चंद्र हि तुझीच रूपे त्रिलोकींचा ओंकार तू ।।१३।।

गकार हा पूर्वरूपी अकार मध्यम नंतर हो । 
चंद्रबिंदू हा अंतरूपी तारस्वरे साधावा हो ।।१४।।

🕉 गँ गणपतये नमः गणक ऋषींनी रचिलेला। 
निचृद्गायत्री साधला छंद वंदूनि पदकमला ।।१५।।

एकदंती चतुर्भुजी वक्रतुंडरूप अलौकिक । 
निज ध्यानीमनी असू दे हीच प्रार्थना मम एक ।।१६।।

अतीव सुंदर रूप शोभते पाशांकुश दो हाती असे । 
दंत धरुनी एके हाती चतुर्हस्ती वरदान वसे ।।१७।।

ज्ञानवंत मूषकासनी तू शूर्पकर्णी रक्तवर्णी तू । 
रक्तरंगी वस्त्रांनी सजला लंबोदर साजिरा तू ।।१८।।

रक्तचंदनी गंध लावूनी पूजिती रक्तफुलानी तुला । 
कृपादृष्टी तव भक्तांवरती तारीसी साऱ्या जगताला ।।१९।।

सृष्टीआधी प्रकृतीपुरुष जग हे सारे निर्मीयले । 
भक्तकृपाळु गणेश चिंती योगी तोचि श्रेष्ठ असे ।।२०।।

व्रातपती शिवसुता तुजला विश्वतारण्या प्रार्थना । 
चरणकमली मी करितो वंदन विघ्ननाशका गजानना ।।२१।।

                                                                                                                                - तेजस दिगंबर लिमये 



_______________________________________________________________________________________

चालीसाठी संदर्भ  

Comments

  1. खूपच छान.....धन्यवाद

    ReplyDelete
  2. वा!खूपच छान जमलंय!👍👌


    ReplyDelete
  3. खूपच सुंदर ����

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर. शब्दांची पेरणी अगदी छान झाली आहे त्यामुळे हे काव्यरूपी अथर्वशीर्ष देखील तितकेच मधुर वाटते आहे.

    ReplyDelete
  5. सुंदर, धन्यवाद तेजस जी 🙏

    ReplyDelete
  6. Feeling very relaxed and can feel the divinity in this

    ReplyDelete
  7. सुंदरच, प्रतिलीपी वर पोस्ट करावे

    ReplyDelete

Post a Comment